अँटीबायोटिक्स घेताय? पुन्हा एकदा विचार करा!!
Centre for disease dynamics economics and policy च्या अहवालानुसार २०५० सालापर्यंत भारतात प्रतिजैविक प्रतिरोध अर्थात 'Antibiotics resistance' मुळे ३० कोटी लोक मृत्युमुखी पडलेले असतील. भारतात दरवर्षी सुमारे ६०,००० लहान मुले
Antibiotics resistance मुळे मृत्युमुखी पडतात.
अँटीबायोटिक्स रेझिस्टन्स म्हणजे काय?
अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके म्हणजे बॅक्टेरियावर दिली जाणारी औषधे. आपला जीव वाचवणे ही प्रत्येक सजीवाची धडपड असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून बॅक्टेरिया हे स्वतःला या अँटीबायोटिक्स पासून सुरक्षित बनवणारे बदल स्वतःच्या रचनेत घडवून आणतात आणि काही काळातच ही औषधे निष्प्रभ ठरू लागतात.
अँटीबायोटिक्स रेझिस्टन्स का होतो?
याची कारणे बरीच आहेत. मात्र शब्दमर्यादा लक्षात घेता आपण या अहवालात मांडलेली सर्वात प्रमुख तीन कारणे पाहूया.
१. उठसूट अँटीबायोटिक्स वापरल्याने!!
सर्दी-खोकला यांसारख्या आधुनिक शास्त्राच्या मते बहुतांशी व्हायरसमुळे होणाऱ्या विकारांवरदेखील सर्रास अँटीबायोटिक्स घेण्यास अनेक डॉक्टरर्स सांगतात. ही पद्धत चूक आहे असे आधुनिक वैद्यकातील तज्ज्ञच सांगतात. व्हायरसमुळे झालेल्या विकारावर बॅक्टेरियावरील उपचार म्हणजे 'आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी' अशी गत आहे. झटपट आराम मिळवण्याच्या नादात इतकं लक्ष कोण बरं देणार?! या मुद्द्यावर US FDA ने त्यांच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती दिली आहे.
२. अँटीबायोटिक्सचा वापर कोणाही डॉक्टरला न दाखवता स्वतःच्या बुद्धीने करणे.
३. अँटीबायोटिक्स टोचलेल्या प्राण्यांच्या मांसाचे आणि दुधाचे सेवन करणे.
यावर उपाय काय?
३. शक्य तितक्या प्रमाणात शाकाहारी रहा. त्यातही ऑरगॅनिक फळ-भाज्यांवर भर द्या. दूध घेत असताना जर्सीचे पिशवीबंद केलेले घेण्याऐवजी देशी गायींचे दूध घ्या. देशी गायींना बहुतांशी अँटीबायोटिक्स द्यावीच लागत नसल्याने त्यांच्या दुधात अंश येण्याचा संबंधच नसतो.
२. स्वतःच स्वतःचे डॉक्टर बनु नका. कोणतेही वैद्यकशास्त्र असो; 'स्वयंउपचार' हे घातकच.
३. आजारी पडलात तर सर्वप्रथम शुद्ध आयुर्वेदीय उपचार देणाऱ्या वैद्यांकडे जा. आयुर्वेदापाठोपाठ होमिओपॅथीचा आधारदेखील घेतला जाऊ शकतो. विशेषतः लहान मुलांना तर आजकाल उठसूट सर्दी- खोकला- ताप- जुलाब यांवर अँटीबायोटिक्स देण्याची जी 'फॅशन' निघाली आहे त्यामुळे दीर्घकाळाचे नुकसान होत असल्याचे ठळकपणे समोर येत आहे. अँटीबायोटिक्स हे आपल्या औषधींच्या भात्यातील शेवटचे शास्त्र म्हणून आणि अगदी नाईलाज झाला तरच वापरण्याची गोष्ट आहे. डास मारायला आपण थेट अणुबॉम्बचा वापर करू असा विचार करतो का? तसेच इथेही आहे. आयुर्वेदाची मदत वेळेत घेतल्यास हे अखेरचे शस्त्र इतक्या लहानसहान गोष्टीकरता वापरावेच लागणार नाही आणि एकंदरीतच 'अँटीबायोटिक्स रेझिस्टन्स'च्या यक्षप्रश्नावर उत्तर नाही तरी मार्ग सापडेल.
(टीप: हा लेखांक वाचून कदाचित काहीजणांचे 'आर्थिक हितसंबंध' दुखावले जातील. मात्र जनसामान्यांचे आरोग्य हे सर्वोपरी आहे. त्यासमोर अन्य काही महत्वाचे नाही हे लक्षात घेऊन आणि तटस्थपणेच लिखाण केले आहे हे सुज्ञ वाचकांना सहज लक्षात येईल.)
No comments:
Post a Comment