Saturday, 8 October 2016

ज्ञानवानी

🙏🏻🌹 *ज्ञान-वाणी* 🌹🙏🏻
*श्रीज्ञानेश्वरी नववा अध्याय*
॥ श्रीज्ञानेश्वर माऊलि समर्थ ॥
॥ *श्रीविद्याराजगुह्ययोग* ॥

परि सर्वथा आपुलां जीवीं ।
केलियाची शंका कांहींचि नुरवीं ।
ऐसीं धुवोनि कर्मे द्यावीं ।
माझियां हातीं ॥ ४०१ ॥
    पण आपल्या अंतःकरणांत मी अमुक केलें अशी कर्तृत्वाची यत्किंचित् देखील आठवण होणार नाही, अशी धुतल्याप्रमाणे सर्व कर्में मला अर्पण कर.

मग अग्निकुंडी बीजें घातलीं ।
तियें अंकुरदशे जेविं मुकलीं ।
तेवि न फळतीचि मज अर्पिलीं ।
शुभाशुभें ॥ ४०२ ॥
      मग अग्निकुंडात घातलेले बी जसे अंकुर दशेला येत नाही, त्याप्रमाणे मला अर्पण केलेले पुण्यपापरूप कर्मही सुखदुःखरूप फळ देत नाही.

अगा कर्मे जैं उरावें ।
तैं तिहीं सुखदुःखीं फळावें ।
आणि तयातें भोगावया यावें ।
देहा एका ॥ ४०३ ॥
    अर्जुना ! कर्म जर करत राहील तर त्याचे सुख किंवा दुःख फळ होईल आणि तें कर्मफळ भोगण्याकरिता देह घ्यावा लागेल म्हणजेच परत जन्माला यावें लागेल.

तें उगाणिलें मज कर्म ।
तेव्हांचि पुसिलें मरण जन्म ।
जन्मासवें श्रम ।
वरचिलही गेले ॥ ४०४ ॥
     तें कर्मच जर कर्तृत्वासह मला अर्पण केलें, तर कर्माच्या अर्पणाबरोबरच जन्ममरण पुसलें जातें आणि जन्म नाहीसा झाल्या बरोबर जन्मांतरी मिळणारें दुःखहि नाहीसें होतें.

म्हणऊनि अर्जुना यापरि ।
पाहेचा वेळु नव्हेल भारी ।
हे संन्यासयुक्ति सोपारी ।
दिधली तुज ॥ ४०५ ॥
      म्हणून अर्जुना ! कर्मकर्तृत्व व भोक्तृत्वरहित होऊन मद्रूप होण्याची ही सोपी युक्ति तुला सांगितली आणि याप्रमाणे याचा अनुभव घेण्याला तुला फार वेळ लागणार नाही.

*॥जय जय श्रीरामकृष्ण हरि॥*

No comments:

Post a Comment