Wednesday, 31 August 2016

*वयाने व मनाने ४५शी पर्यंत आलेल्या किंवा गाठलेल्या सर्वांसाठी* 

_50 नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर त्यासाठी 12 नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील._
हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.

*1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते.*

धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये.

*2)  तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात.*

*3) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवढाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नसताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.*

*4) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तु व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा इन्जॉय करणे कठीण असते.*

*5) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघीतले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणार्याा आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वात महत्वाचा आहे. त्यामूळे भूतकाळातील वाईट आठवणींमूळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील.*

*6) तुमचे वय काहिही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो.*

*7) स्वतःविषयी अभीमान बाळगा. तो अंतरबाह्य असुदे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल.*

*8) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुषाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल.*

*9) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचीत तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे.*

*10) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचीत तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागीतले तरच. उगीच च्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला.*

*11) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजीबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामूळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा.*

*12) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामूळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामूळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व चिअरफूल माणसेच लोकांना आवडत असतात..*
🙏🙏🙏💐💐🙏🙏🙏

खरंच खुप छान आहे. आणि हि पोस्ट महत्वाची वाटली. लिहीणार्याला मनापासून धन्यवाद 🙏
_मला आवडली म्हणून मी इतरांशी शेअर केली_

Tuesday, 9 August 2016

नमस्कार का करावा

नमस्कार का करावा

नमस्कार ……….
वृद्ध व्यक्‍तीचा प्रवास हा हळूहळू दक्षिण दिशेला, म्हणजे यमलोकाकडे (मृत्यूकडे) होत असल्याने तिच्या शरीरातून रज व तम लहरींचे प्रक्षेपण मोठ्या प्रमाणावर होऊ लागते. अशी वृद्ध व्यक्‍ती समोर आल्यावर तरुण व्यक्‍तीच्या शरीरावर त्या लहरींचा परिणाम होतो व त्या दोघांमध्ये सूक्ष्म-चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्यामुळे तरुण व्यक्‍तीचे पंचप्राण वर उचलले जातात. अशा प्रकारे अचानक पंचप्राणांना मिळालेल्या गतीमुळे व्यक्‍तीला त्रास होण्याची शक्यता असते. जेव्हा तरुण व्यक्‍ती वृद्ध व्यक्‍तीला नमस्कार करते, तेव्हा तरुण व्यक्‍तीतील सुषुम्नानाडी काही प्रमाणात जागृत होते व तरुण व्यक्‍तीतील सत्त्वगुण वाढू लागतो. त्यामुळे तिच्यातील रज व तम गुणांवर सत्त्वगुणाचा प्रभाव होऊ लागतो व तिचे प्राण पूर्वस्थितीत येतात. यासाठी वृद्ध व्यक्‍तीचे आगमन होताच तिला लहानांनी नमस्कार करण्याची पद्धत आहे.'
वयाने, मानाने थोर असणार्‍या व्यक्तींचे पाया पडण्याची रीत फार पूर्वीपासून आहे. सनातन धर्मांप्रमाणे मोठ्यांप्रती आदर दर्शविण्यासाठी चरणस्पर्श करणे उत्तम मानले जाते. चरणस्पर्शाचे मानसशास्त्रीय तसंच वैज्ञानिक कारणंही आहेत.
1. वाकून पाया पडण्याने विनम्रता येते आणि मनाला शांतीदेखील मिळते.
2. पाया पडल्यावर मोठे व्यक्ती आशीर्वाद देण्यासाठी त्यांचा हात आमच्या डोक्यावर स्पर्श करतात. या प्रकारे त्या पूजनीय व्यक्तींची सकारात्मक ऊर्जा आशीर्वादाच्या रूपात आमच्या शरीरात प्रवेश करते आणि आमचा आध्यात्मिक व मानसिक विकास होतो.
3. शास्त्राप्रमाणे दररोज थोर मोठ्यांच्या पाया पडण्याने दीर्घ आयुष्य व उच्च शिक्षण प्राप्त होतं आणि प्रसिद्धीत वाढ होते.
4. शरीरात उत्तर ध्रुव म्हणजे डोक्यातून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करून दक्षिण ध्रुव म्हणजे पायाकडे प्रवाहित होते. आणि पायात ही ऊर्जा अमर्यादित प्रमाणात स्थिर होऊन जाते. म्हणूनच पायाला हात लावून नमस्कार केल्याने ही ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते.
5. असा विश्वास आहे की पायाच्या अंगठ्याहून सुद्धा शक्तीचा संचार होतो.
6. असे म्हणतात की थोर मोठ्यांच्या नियमित पाया पडल्याने प्रतिकूल ग्रहदेखील अनुकूल होऊन जातात.
7. वाकून पाया पडणे हा एकाप्रकारे शारीरिक व्यायामदेखील आहेत. वाकून नमस्कार करणे, गुडघ्यावर बसून नमस्कार करणे किंवा साष्टांग दंडवत घातल्याने शरीर लवचिक होतं.
8. नमस्कार करताना पुढे वाकल्याने डोक्यात रक्त प्रवाह वाढतो जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
9. वाकून नमस्कार करण्याने आमच्यातला अहंकारदेखील कमी होतो.
10. काही लक्ष्य ठेवून मोठ्यांच्या पाया पडल्याने लक्ष्य प्राप्तीसाठी बळ मिळतं.
यामुळेच लहान मुलांना मोठ्यांच्या पाया पडण्याचे नियम आणि संस्कार दिले जातात.

अत्यंत सूक्ष्म शास्त्रीय विचारांमुळे हिंदू धर्म जगात महान समजला जातो 🙏 🙏

Helmet हेल्मेट सुरक्षा कि नुकसान

हेल्मेट वापरणे खरोखरच सुरक्षितेसाठी फारच आवश्यक आहे. सर्वानी ते वापरलेच पाहिजे यात शंका नाही.
पण ते वापरण्याची जी सक्ती केली आहे त्याचे काही मजेशीर तोटे जे मला जाणवत आहेत ते खालील प्रमाणे.

१) दूध, ब्रेड, बिस्कीट अशा लहान सहान खरेदीला सकाळी सकाळी आंघोळ न करता टी-शर्ट, बर्मोडा वर हेल्मेट घालून जाणे
२) ऐन थंडीत सर्दीने गळणारे नाक मोटार सायकल चालवता हेल्मेट ची काच वर करून आत रुमाल कोंबून पुसणे किंवा गाळणाऱ्याला गळू द्यावे
३) बाहेर गावाहून येणाऱ्या पाहुण्याला बस स्टॅन्ड वरून आणायला जाताना एकतर त्याचासाठी घरातून एक्स्ट्रा हेल्मेट घेऊन जाणे किंवा त्याला येतानाच त्याचा स्वतःचा आणायला सांगणे
४) वाहन चालवताना डोक्यात खाज आलीच तर सहन करणे किंवा मानसिक समाधानासाठी हेल्मेटलाच खाजविणे
५) घरातील वयस्कर स्त्रिया आजी, आई व आत्या यांना महादेवाच्या दर्शनाला नेताना नऊवारीवर हेल्मेट घालावयास लावणे
६) बायकोला लग्नाला घेऊन जाताना तिची नवीन हेअर स्टाईल, डोक्यातील सुरेख बिंदी, क्लिपा, सुगंधी गजरा अशा अनेक गोष्टींना हेल्मेट मध्ये कोंबून घालणे. आणि तिथे पोहोचल्यावर हेल्मेट काढल्यावर तिच "मंजुलिका " रुप सहन करणे
७) बायकोच्या साडी / ड्रेस वर मॅचिंग हेल्मेट खरेदीचा मानसिक त्रास
८) आहेर मान पानात टॉवेल-टोपी ची जागा टॉवेल-हेल्मेट लवकरच घेणार
९) गावाकडील आजोबाना एकतर डोक्यावरचा फेटा मावेल इतका मोठा हेल्मेट बनवून घ्यावा लागेल किंवा दोन्ही आलटून पालटून वापरावा लागेल
१०) एखादी बाई वाहन चालवताना अचानक समोर वडीलधारी माणसे प्रकटल्यास चटकन हेल्मेटवर पदर घेऊन नमस्कार करणे
११) तुमचे स्वतःची दुचाकी नसेल आणि तुम्हाला वरचेवर इतरांच्या लिफ्ट ची गरज भासत असेल तर स्वतःचे एक हेल्मेट जवळ नेहमी बाळगा.
१२) सवयीने तुम्ही हेल्मेट घालून रस्त्यामधील मंदिरास नमस्कार केल्यास, नक्की कोण नमस्कार केले ते देवाला न कळल्याने तुम्ही आशिर्वादास मुकू शकता
अजून काही तुम्हाला सुचत असल्यास  अभिप्राय द्यावेत

दीप आमवस्या

*⚜दीप पूजा⚜*

    *(दीप अमावस्या)*

येत्या.....
दिनांक: ०२/०८/२०१६
वार:-मंगळवार

*आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या...!*

*सगळ्यांना गटारी अमावस्या म्हणून चांगलीच लक्षात राहते...!*

♀पण हि दिव्यांची अमावस्या म्हणून ही लक्षात ठेवावी...!

घरातील दिव्यांना दुध पाण्याने धुउन स्वच्छ करावेत...!

पाटावर वस्त्र घालून ठेवावेत त्यांची पूजा करावी...!
आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरु होते.

आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी...!

गोडाचा नेवैद्य अर्पण करावा ..!

आपल्या घरातील छोटा / छोटीला औक्षण करावे...! वंशाचा दिवा असतो न म्हणून आता मुलगा मुलगी हा भेद करत नाही त्यामुळे आपल्या दिव्याचे किंवा पणतीचे नक्की औक्षण करावे...!

दुर्वा ही वंश वृद्धीचे प्रतिक आहे , त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी ....!!

या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात...!

त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्ज्वलित करून त्याची पूजा केली जाते....!

पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात...!

•• ती प्रार्थना अशी ••

*‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥*

•• त्याचा अर्थ असा ••

*‘‘हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस...!*
*तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस..!*
*माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’..!!*

त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते...!
आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते...!
असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.

*या पूजाव्रताची कथा खालीलप्रमाणे सांगितली आहे...!*

तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती..!

लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या...!

पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली..!
गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला...!

भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली..!
नंतर सगुणेचा विचार करू लागली.

गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले...!

तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले..!

गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही..!

लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली...!

एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्‌ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली...!

अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली...!

नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली..!
राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले..!
सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ ..!

राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले...!
तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते...!

आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही..!
अशी शपथ घाल...!

त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली..!
या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य
खूप झाले...!

राज्यातले लोक
सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले...!!

अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली आहे....!!!

परंतु आपल्या लोकांनी तिला ‘गटारी’ करून टाकली याला काय म्हणावे....!!!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*विद्रोही कलावंत अण्णाभाऊ साठे*

*विद्रोही कलावंत अण्णाभाऊ साठे*
१ ऑगष्ट म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस. अण्णाभाऊंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना. अस्पृश्य जातीमध्ये जन्म झाल्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना बालपणापासूनच दारिद्रयाचे आणि सामाजिक विषमतेचे चटके सहन करावे लागले. एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता अण्णाभाऊंचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नाही. जीवनाच्या शाळेतच अण्णाभाऊ घडत गेले. अर्थातच औपचारिक शिक्षण न मिळाल्यामुळे अनौपचारिक शिक्षणातून त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक समृद्ध होत गेले. त्यांचा वाटेगाव ते मुंबई हा प्रवासच मुळात कामाच्या, भाकरीच्या शोधात झाला आहे. त्यामुळे मुंबईत आल्यानंतर त्यांना पोटासाठी अनेक प्रकारची कामं करावी लागली. बालपणातील अशा दाहक, वेदनामय अनुभवामुळे त्यांचे मन बंडखोर, विद्रोही  बनत गेले.
मुंबईमध्ये पोटासाठी अनेक प्रकारची कामं करताना, कामगार म्हणून वावरताना त्यांना मार्क्स, लेनिन, गॉर्कीच्या विचाराने प्रभावित केले. समाजातील आर्थिक विषमता, दारिद्रय नष्ट करण्याचा आणि सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा समान हक्क देणारा मार्ग म्हणून त्यांना मार्क्सवाद प्रेरक वाटला. रशियन मार्क्सवादी कादंबरीकार गॉर्की हा अण्णाभाऊ साठेंचा आवडता लेखक आहे. गॉर्कीच्या साहित्याचा आणि विचाराचा मोठा प्रभाव त्यांच्या साहित्यावर दिसून येतो. त्यामुळेच ते साहित्याकडे समाजपरिवर्तनाचे, क्रांतीचे एक महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून पाहतात. उपेक्षित समाजाला सर्व प्रकारच्या गुलामीतून मुक्त करण्याचे काम त्यांना साहित्याकडून अपेक्षित आहे. मार्क्सवादाबरोबरच नंतरच्या काळात डॉ. आंबेडकरांचा विचारही त्यांना समाजपरिवर्तनासाठी प्रेरक वाटला. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. आंबेडकरांचा विचार त्यांना महत्त्वाचा वाटतो. म्हणून मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद या त्यांच्या लेखनामागील दोन मुख्य प्रेरणा आहेत.
अण्णाभाऊंची मराठी मातीशी आणि लोकजीवनाशी असणारी नाळ अतिशय घट्ट आहे. बालपणातच लोककलेचा त्यांनी जवळून अनुभव घेतला होता. अर्थातच, उपेक्षितांच्या जीवनातील लोककलेला म्हणजेच तमाशा, पोवाडा, लावणीला मार्क्सवादी दृष्टीचा साज चढवून अण्णाभाऊंनी समाज परिवर्तनाच्या संघर्षाला सुरुवात केली. कामगारांना जागृत, संघटित करण्यासाठी ते पोवाडे, लावण्या, क्रांतिगीते रचू लागले. मंचावरून सादर करू लागले. साधारणपणे १९४२ ते १९५० या काळामध्ये अण्णाभाऊ ‘लोकशाहीर’ म्हणून नावारूपाला आले.
अण्णाभाऊ लोककलावंत होते. त्यांच्याकडे मानवी जीवन समजून घेण्यासाठी लागणारी संवेदना होती. या संवेदनेमुळे आणि मार्क्सवादी तत्त्वज्ञानामुळे त्यांना मानवी जीवनाकडे आणि साहित्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळेच त्यांना माणूस आणि त्या माणसाचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात.
‘लाल बावटा कलापथका’च्या माध्यमातून अण्णाभाऊंनी महाराष्ट्रभर जनजागृतीचे काम केले. शेकडो कार्यक्रमातून त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जनतेला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. ते स्वतःच कामगार असल्यामुळे त्यांना कामगारांच्या मूलभूत प्रश्नांची जाणीव होती. कामगारांचे भांडवलदार वर्गाकडून होणारे शोषण त्यांना चांगलेच माहीत होते. या भांडवलशाहीच्या जोखडातून कामगारांना मुक्त करण्यासाठी त्यांनी कामगार लढîkत स्वतःला झोकून दिले. कामगार चळवळ मजबूत करण्यामध्ये अण्णाभाऊंचे जसे महत्त्वाचे योगदान आहे, तसे अण्णाभाऊंच्या जडणघडणीत कामगार चळवळीचा मोठा वाटा आहे. त्यांच्या जीवनसंघर्षाचा पूर्वार्ध म्हणून कामगारांच्या लढयातील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
१९४२ ते १९६२ हा वीस वर्षाचा काळ अण्णाभाऊ साठे यांना माणूस आणि कलावंत म्हणून अधिकाधिक उंचीवर नेणारा ठरला. वाटेगाव ते मुंबई हा प्रवास पायी करणारे अण्णाभाऊ आपल्या आवडत्या तत्त्वज्ञानावर उभा असलेला देश पाहण्यासाठी १९६१ मध्ये मुंबई ते मास्को हा प्रवास विमानाने करतात.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अण्णाभाऊंसारख्या लढाऊ कार्यकर्त्यामुळे अधिक व्यापक आणि सामर्थ्यशाली बनली. अशा अनेक कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाली. कामगार, कवी, लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चळवळीत काम करणारा कार्यकर्ता, लोकनाटयाचे जनक, उत्तम नट, पत्रकार, निर्माता, आणि माणसावर, मानवी जीवनावर उत्कट प्रेम करणारा माणूस असे विविध पैलू अण्णाभाऊंच्या  व्यक्तिमत्त्वात आहेत. या अर्थाने अण्णाभाऊ साठे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ठरते. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा शेवट मात्र मनाला चटका लावणारा आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबरी, शाहिरी कविता, लोकनाटय, नाटक आणि स्फुट लेखनातून विद्रोही जाणिवांचा उत्कट आविष्कार झाला आहे. वर्ग-जाती संघर्षाचे संमिश्र चित्रण त्यांच्या साहित्यात येते. म्हणून वर्गसमाज आणि जातिसमाज हे त्यांच्या विद्रोहाचे लक्ष्य आहे. अन्यायाविरुद्धची झुंज, संघर्ष, विद्रोह हा त्यांच्या लेखनविश्वाचा स्थायी भाव आहे. शोषक आणि शोषित यांच्यातील संघर्ष हा त्यांच्या साहित्याचा मुख्य विषय आहे. त्यांच्या सर्व प्रकारच्या लेखनातून शोषणाचा धिक्कार, प्रतिकार आणि स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभावाचा पुरस्कार प्रत्ययास येतो. सामाजिक आणि आर्थिक विषमतेने शोषित माणसाचे ‘माणूस’ म्हणून असणारे अस्तित्वच नाकारले. अशा शोषितांना माणूसपण प्राप्त करून देण्यासाठीच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विद्रोही जीवनमूल्यांची पेरणी करते. उपेक्षित-शोषितांच्या अंतरंगातील विद्रोह आधुनिक मराठीतील ललित साहित्यात प्रथमच अण्णाभाऊंच्या साहित्यातून अनुभवाचा व्यापक पट घेऊन अभिव्यक्त झाला.
अण्णाभाऊपूर्व मराठी साहित्याचा केंद्रबिंदू मध्यमवर्ग होता. अण्णाभाऊंनी मात्र मस्तकात विद्रोह घेऊन जगणाऱ्या उपेक्षित, शोषित वर्गाला मराठी साहित्याचा केंद्रबिंदू बनविले. हा त्यांचा विद्रोही प्रवास आधुनिक मराठी ललित साहित्यात अपूर्वच म्हणायला हवा. एकूणच, अण्णाभाऊ साठे यांचे सबंध साहित्यच विद्रोहाचे जीवनगाणे आहे. या त्यांच्या साहित्याच्या मस्तकात विद्रोहाचा अग्नी आहे, तर हृदयात समतेचे, न्यायाचे मंगलमय मधुर, सुगंधी संगीत आहे.
अण्णाभाऊ साठे यांचे सबंध साहित्यच विद्रोही तत्त्वज्ञानावर उभे आहे. हे विद्रोही तत्त्वज्ञान त्यांना मार्क्स, गॉर्की, फुले, आंबेडकर यांच्याकडून मिळालेले आहे. या विद्रोही तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेऊन अण्णाभाऊंनी मराठी साहित्याच्या भूमीत समाजपरिवर्तनाचा विचार पेरला. क्रांतीचा मळा फुलवला, सजवला. म्हणून आधुनिक मराठीतील महात्मा फुल्यांपासून चालत आलेल्या विद्रोही ललित साहित्याच्या प्रवाहाला अधिक सशक्त आणि व्यापक बनविणारे साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे महत्त्वाचे  ठरतात.
शोषणाला नकार देणारी आणि समतेचा पुरस्कार करणारी विद्रोही सांस्कृतिक परंपरा बळीराजा, चार्वाक, महावीर, बुद्ध, कबीर, तुकाराम, फुले-शाहू-आंबेडकर यांनी समृद्ध केली आहे. सर्व प्रकारच्या शोषणावर ‘घाव’ घालणारे अण्णाभाऊ साठे याच विद्रोही सांस्कृतिक विचारधारेचे वारसदार ठरतात.
संदर्भ: 'विद्रोही कलावंत: अण्णाभाऊ साठे'  
- अमोल